नीट पुनर्परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका वायुसेनेद्वारे अमरावतीत, १४ केंद्रांवर सीआरपीएफचा बंदोबस्त
अमरावती, 20 जून (हिं.स.) : नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणानंतर देशभरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी, 21 जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे परीक्षा के
NEET परीक्षेसाठी प्रशासन सज्ज! सीआरपीएफ-पोलिसांच्या सुरक्षेत प्रश्नपत्रिका केंद्रावर


अमरावती, 20 जून (हिं.स.) : नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणानंतर देशभरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी, 21 जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी वायुसेना, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि राज्य पोलीस दलाची मदत घेण्यात आली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत असून, या घटनेमुळे केंद्र सरकारवरही टीकेची झोड उठली आहे. अनेक विद्यार्थ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागला असून काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. यामुळे उच्च शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही विविध स्तरांतून करण्यात आली.

पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. 15 जून रोजी वायुसेनेच्या मदतीने आर्मीच्या हेलिकॉप्टरद्वारे प्रश्नपत्रिका अमरावतीत आणण्यात आल्या. सध्या या प्रश्नपत्रिका जिल्हा कोषागार तसेच कॅम्प रोडवरील स्टेट बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

रविवारी परीक्षा दिवशी या प्रश्नपत्रिका सीआरपीएफ आणि पोलीस दलाच्या कडेकोट सुरक्षेत शहरातील 14 परीक्षा केंद्रांवर पोहोचवण्यात येणार आहेत. जिल्हा कोषागार आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅम्प शाखेत उभारलेल्या विशेष स्ट्राँग रूममध्ये प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या असून, त्या ठिकाणांना पूर्णपणे सील करण्यात आले आहे.

सुरक्षेच्या उपाययोजनांचा भाग म्हणून दोन्ही स्ट्राँग रूमच्या संरक्षणासाठी 24 तास एक अधिकारी आणि चार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, संपूर्ण प्रक्रियेदरम्यान 20 पीएसआयंसह सुमारे 120 पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रशासनाच्या या व्यापक सुरक्षा व्यवस्थेमुळे पुनर्परीक्षा पारदर्शक आणि निर्विघ्न वातावरणात पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande