नाशिक : कोर्टाने जप्त केलेल्या फ्लॅटवर कर्जदारांचा पुन्हा कब्जा, गुन्हा दाखल
नाशिक, 20 जून (हिं.स.) : बँकेचे 15 लाख रुपयांचे कर्ज थकवून न्यायालयाने जप्त करून सील केलेली मालमत्ता कर्जदारांनी संगनमत करून पुन्हा बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकरोड परिसरातील देवळाली शिवारात उघडकीस आला आहे. न्यायालयाच्
नाशिक : कोर्टाने जप्त केलेल्या फ्लॅटवर कर्जदारांचा पुन्हा कब्जा, गुन्हा दाखल


नाशिक, 20 जून (हिं.स.) : बँकेचे 15 लाख रुपयांचे कर्ज थकवून न्यायालयाने जप्त करून सील केलेली मालमत्ता कर्जदारांनी संगनमत करून पुन्हा बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकरोड परिसरातील देवळाली शिवारात उघडकीस आला आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार सील करण्यात आलेल्या फ्लॅटचे कुलूप, सूचनाफलक आणि ताबा नोटीस तोडून पुन्हा अनधिकृत प्रवेश करण्यात आल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात कर्जदार व जामीनदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही तक्रार दि नाशिकरोड देवळाली व्यापार सहकारी बँक लि.चे मुख्य व्यवस्थापक संजय जगन्नाथ जाधव यांनी दिली आहे. त्यानुसार कर्जदार रूपेश सुरेश पाटोळे (वय 43), सुरेखा सुरेश पाटोळे (वय 67) आणि जामीनदार प्रणव सुरेश पाटोळे (वय 46, सर्व रा. साईविश्व अपार्टमेंट, सिन्नर फाटा) यांच्यावर कायदेशीर उल्लंघन आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी 3 फेब्रुवारी 2021 रोजी देवळाली शिवारातील पाटोळे टॉवर्स येथील फ्लॅटवर ₹15 लाखांचे सिक्युअर्ड कर्ज घेतले होते. मात्र जून 2021 पासून त्यांनी हप्ते भरणे थांबवले. कर्ज एनपीए झाल्यानंतर बँकेने SARFAESI कायद्यानुसार न्यायालयात कारवाई सुरू केली.

न्यायालयाने 7 नोव्हेंबर 2025 रोजी मालमत्तेचा ताबा बँकेकडे देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 11 जून 2026 रोजी कोर्ट कमिशनरमार्फत फ्लॅटचा ताबा बँकेकडे देऊन सील करण्यात आला होता.

मात्र, 15 जून रोजी बँक अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता सील, कुलूप आणि नोटीस गायब असल्याचे आढळले. त्या ठिकाणी नवीन कुलूप लावून फ्लॅटचा वापर सुरू असल्याचेही स्पष्ट झाले.

या प्रकारामुळे न्यायालयाच्या आदेशाचा थेट अवमान झाल्याने बँकेने पोलिसांत धाव घेतली असून नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. हवालदार गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. न्यायालयीन आदेश धाब्यावर बसवणाऱ्या या प्रकरणामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.--------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande