अमरावतीत एमडी ड्रग्जसह तस्कर अटकेत, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त :
अमरावती, 20 जून (हिं.स.) : शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर मोठा प्रहार करत नागपुरी गेट पोलिसांनी एका रेकॉर्डवरील आरोपीला एमडी ड्रग्जसह रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १८.८ ग्रॅम एमडी ड्रग्जसह एकूण ₹१,४६,२०० किमतीचा मुद्देमाल जप्त
अटक लोगो


अमरावती, 20 जून (हिं.स.) : शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर मोठा प्रहार करत नागपुरी गेट पोलिसांनी एका रेकॉर्डवरील आरोपीला एमडी ड्रग्जसह रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १८.८ ग्रॅम एमडी ड्रग्जसह एकूण ₹१,४६,२०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुप्त माहितीच्या आधारे नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंसार नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना माहिती मिळाली होती की, रेकॉर्डवरील आरोपी शेख इरफान उर्फ अंगारी हा आपल्या मोपेडवरून पाण्याच्या टाकीमागील अकॅडमिक ग्राऊंड परिसरात एमडी विक्रीसाठी येणार आहे.

माहिती मिळताच डीबी पथक प्रमुख पोलीस अंमलदार मलिक अहमद यांनी तत्काळ ठाणेदार मनोहर कोटलाके यांना कळवले. त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करून संपूर्ण परिसरात सापळा रचण्यात आला.

थोड्याच वेळात संशयित आरोपी मैदानात मोपेडवरून येताना दिसताच पोलिसांनी त्याला घेराव घालून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव शेख इरफान उर्फ अंगारी शेख कलीम (वय २४, रा. रतनगंज, पहिला नागोबा ओटा, अमरावती) असल्याचे सांगितले.

झडतीदरम्यान त्याच्याकडून १८.८ ग्रॅम एमडी (किंमत अंदाजे ₹९४,०००), ₹५०,००० किमतीची मोपेड आणि ₹२,२०० रोख रक्कम असा एकूण ₹१,४६,२०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई उपनिरीक्षक जितेंद्र भार्गव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार दिनेश नांदे, दानिश शेख, राहुल रोडे, सागर पंडित, विक्रम नशिबकर आणि चालक जाकीर अहमद यांनी यशस्वीपणे पार पाडली.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande