
अमरावती, 20 जून (हिं.स.)
विदर्भाच्या रेल्वे इतिहासातील महत्त्वपूर्ण वारसा मानली जाणारी शकुंतला रेल्वे पुन्हा रुळांवर धावणार कधी, याकडे दर्यापूरसह संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या ऐतिहासिक रेल्वेच्या पुनरुज्जीवनासाठी हालचालींना वेग आला असून मार्गाचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सध्या विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मूर्तिजापूर–अचलपूर आणि मूर्तिजापूर–यवतमाळ या नॅरोगेज मार्गावर धावणारी शकुंतला रेल्वे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी मानली जात होती. मात्र मार्गाची जीर्ण अवस्था आणि तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला.माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात अचलपूर ते मूर्तिजापूर या सुमारे ७७ किलोमीटर मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मूर्तिजापूर ते यवतमाळ या सुमारे ११२ किलोमीटर मार्गाचे काम हाती घेतले जाईल. संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे १,५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे रेल्वे बचाव समितीने यापूर्वी स्पष्ट केले आहे.दर्यापूर हे या मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्याने रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाल्यास प्रवासी वाहतूक, कृषी मालाची ने-आण, व्यापार-उद्योग आणि स्थानिक रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची बाजारपेठांपर्यंत जलद वाहतूक करण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
शकुंतला रेल्वेच्या पुनरुज्जीवनासाठी रेल्वे बचाव समिती आणि स्थानिक नागरिकांनी सातत्याने आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा करून हा प्रश्न केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिला आहे. या प्रयत्नांमुळेच प्रकल्पाला गती मिळाल्याचा दावा समितीकडून करण्यात येत आहे. मात्र अंतिम मंजुरी, निधीची उपलब्धता आणि प्रत्यक्ष कामाच्या गतीवरच शकुंतला रेल्वेच्या पुनरागमनाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे रेल्वे सुरू होण्याची अधिकृत तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी