
सोलापूर, 20 जून (हिं.स.)।
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील २८ शाळांना शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. बालाजी अमाईन्सच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील २० आणि धाराशिव जिल्ह्यातील ८ अशा एकूण २८ शाळांना साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमांतर्गत ७ शाळांना ७ स्मार्ट टीव्ही, १० शाळांना १० संगणक आणि एक इंटरॲक्टिव्ह बोर्ड, तसेच ११ शाळांना एकूण २२५ बेंच देण्यात आले.यावेळी डी. राम रेड्डी यांनी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमधील शैक्षणिक क्षेत्रासाठी कंपनीकडून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती शिक्षक आणि मुख्याध्यापकांना दिली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला बालाजी अमाईन्सचे सीएसआर विभागप्रमुख अनिल विपत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सर फाउंडेशनचे सिद्धाराम माशाळेसर यांनी कंपनीच्या शैक्षणिक मदतीबद्दल आभार व्यक्त करत जिल्हा परिषद शाळांना स्मार्ट टीव्ही, संगणक आणि बेंच उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार असल्याचे सांगितले.तसेच, बालाजी अमाईन्सकडून सीएसआर अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.या कार्यक्रमाला सर फाउंडेशनचे बाळासाहेब वाघ, बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, अमोल गुंड, विविध शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड