अमरावती मध्यवर्ती कारागृहातील शिपायाला गांजासह पकडले; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
कर्तव्यावर हजर होताना झडतीत उघड; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल अमरावती, 20 जून (हिं.स.) : अमरावती मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, कारागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारा शिपाईच गांजा घेऊन जाताना पकडला गेल्याने खळबळ उ
टॉवर ड्युटीवर जाताना एका विशेष पथकाचा तपास सेंट्रल जेल शिपायाच्या बॅगेतून गांजा जप्त


कर्तव्यावर हजर होताना झडतीत उघड; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

अमरावती, 20 जून (हिं.स.) : अमरावती मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, कारागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारा शिपाईच गांजा घेऊन जाताना पकडला गेल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारागृह अधीक्षक कीर्ती चितामणी यांच्या तक्रारीवरून संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिपाई उदय अशोकराव झपटे यांच्यावर काही दिवसांपासून कारागृह प्रशासनाचे लक्ष होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने प्रशासनाने विशेष पथकाच्या माध्यमातून त्यांच्यावर निगराणी ठेवली होती.

बुधवार, 18 जून रोजी झपटे हे रात्रीच्या पाळीसाठी सुरक्षा टॉवरवर कर्तव्य बजावण्यासाठी आले होते. सायंकाळी सुमारे 5.30 वाजता ते कारागृह परिसरात प्रवेश करून टॉवरच्या दिशेने जात असताना सतर्क पथकाने त्यांना थांबवून झडती घेतली. या झडतीदरम्यान त्यांच्या सामानातून कागदात गुंडाळलेली गांजायुक्त प्लास्टिकची पिशवी आढळून आली.

घटनेची माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनास्थळी पंचनामा करून जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आला. आरोपी कर्मचाऱ्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंतर्गत चौकशीही सुरू

तुरुंग प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधित शिपायाविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. कारागृह अधीक्षक कीर्ती चितामणी यांनी सांगितले की, संबंधित कर्मचारी आधीपासूनच संशयाच्या घेऱ्यात होता. त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. तो कर्तव्यावर येताच त्याच्याकडून गांजाची पाकिटे जप्त करण्यात आली. आरोपी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

गांजासह इतर साहित्यही जप्त

झडतीदरम्यान गांजाव्यतिरिक्त तंबाखूची पाकिटे, इअरफोन, औषधाचे थेंब, टूथपिकचा बॉक्स, कपडे आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले. तसेच मोबाईल फोनच्या तपासणीत काही कागदपत्रे, संपर्क क्रमांक आणि एका कैद्याचे पत्र आढळल्याची माहिती समोर आली आहे. मोबाईलमधील काही संपर्क आणि संभाषणांचीही चौकशी सुरू आहे.यापूर्वी कारागृहातील कैद्यांकडून गांजा जप्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, कारागृह कर्मचाऱ्याकडूनच अंमली पदार्थ जप्त होण्याची ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे.या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित शिपायाकडे गांजा कसा पोहोचला? तो कोणाच्या सांगण्यावरून कारागृहात नेला जात होता? तसेच हा गांजा नेमका कोणासाठी होता? या सर्व बाबींचा तपास सध्या सुरू आहे.

तपासात एखादे संघटित रॅकेट किंवा अंतर्गत संगनमत असल्याचे समोर आल्यास हे प्रकरण एका कर्मचाऱ्यापुरते मर्यादित राहणार नाही. त्यामुळे कारागृह परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करणारी कोणती संघटित यंत्रणा कार्यरत होती का, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस आणि कारागृह प्रशासन विविध अंगांनी चौकशी करत आहेत.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande