
कोल्हापूर, 20 जून (हिं.स.) : भारताचे केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांचे शुक्रवारी रात्री उशिरा कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. ते कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या एकदिवसीय दौऱ्यावर आले असून त्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहावर आहे.
कोल्हापूर विमानतळावर खासदार धनंजय महाडिक, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल तसेच विजय जाधव यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
शनिवारी सकाळी 11 वाजता श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित राहणार आहेत.
विकासकामांच्या शुभारंभानंतर अमित शहा पश्चिम महाराष्ट्र मंदिर विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसराची पाहणी करणार आहेत. मंदिराच्या मूळ वैभवाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तसेच भाविकांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. जगप्रसिद्ध किरणोत्सवासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचाही या आराखड्यात समावेश आहे.
मंदिर विकास आराखड्यावरील चर्चा व पाहणीनंतर दुपारी सुमारे 11.30 वाजता पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित जाहीर सभेला केंद्रीय गृहमंत्री संबोधित करणार आहेत.
दुपारच्या सत्रात अमित शहा इचलकरंजी येथे जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करणार असून शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळ्यातही सहभागी होणार आहेत. त्यानंतर सुमारे 4.45 वाजता कलाप्पाणा आवाडे टेक्स्टाईल पार्क मैदानावर आयोजित शेतकरी मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत.
दिवसभरातील विविध कार्यक्रमांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सायंकाळी सुमारे 7 वाजता कोल्हापूरहून मुंबईकडे रवाना होणार आहेत.
-------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar