चंद्रपूर : अवैध मद्यपान अड्ड्यावर छापा, 5 जणांवर गुन्हा; 21 हजारांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर, 20 जून (हिं.स.) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने वरोरा परिसरात अवैध मद्यविक्री व मद्यपान अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत चार ग्राहकांसह अड्डा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण 21,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आह
चंद्रपूर : अवैध मद्यपान अड्ड्यावर छापा, 5 जणांवर गुन्हा; 21 हजारांचा मुद्देमाल जप्त


चंद्रपूर, 20 जून (हिं.स.) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने वरोरा परिसरात अवैध मद्यविक्री व मद्यपान अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत चार ग्राहकांसह अड्डा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण 21,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई शनिवारी ताडोबा रोडवरील कोयना गेटजवळ रस्त्यालगत असलेल्या अस्थाई टिनाच्या झोपडीत करण्यात आली. येथे परवानगीशिवाय मद्यविक्री करून ग्राहकांना मद्यपानासाठी आवश्यक सुविधा पुरवल्या जात असल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान मुकेश मधुकर रामटेके, विकास विठोबा किरमीरे, राजेश चंद्रकांत वाघ आणि अंबादास नानाजी थेरे हे चार ग्राहक मद्यपान करताना आढळले. तसेच आशिष नत्थुजी खोब्रागडे हा व्यक्ती ग्राहकांना मद्यपानासाठी सुविधा पुरवत असल्याचे निष्पन्न झाले.

सर्वांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65, 68 व 84 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या ग्राहकांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले.

या कारवाईत देशी दारूच्या 200 बाटल्या, 29 व्हिस्कीच्या बाटल्या, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 21,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भरारी पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande