
पुणे, 20 जून (हिं.स.)। हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील माण ते बालेवाडी हा पहिला टप्पा जूनअखेरपर्यंत पूर्ण होणार असून, बालेवाडी ते जिल्हा न्यायालय हा उर्वरित टप्पा ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १२ स्थानकांवरून मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पुणेकरांच्या प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे.२३.२ किलोमीटर लांबीच्या या पूर्णतः उन्नत मेट्रो मार्गावर एकूण २३ स्थानके असणार आहेत. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून संपूर्ण मार्गावरील चाचणी फेऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
माण येथे डेपो आणि ऑपरेशन कंट्रोल सेंटर (ओसीसी) उभारण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात माण ते बालेवाडीदरम्यानची सेवा जूनअखेरपर्यंत सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्यानंतर बालेवाडी ते जिल्हा न्यायालय हा टप्पा ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.सध्या हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानचा प्रवास करण्यासाठी सुमारे दीड तास लागतो. मात्र, पुणेरी मेट्रो सुरू झाल्यानंतर हा प्रवास जवळपास ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे, जिल्हा न्यायालय स्थानकावर पुणेरी मेट्रोची महामेट्रोच्या लाइन १ आणि लाइन २ सोबत थेट जोडणी होणार असल्याने प्रवाशांना संपूर्ण पुणे मेट्रो नेटवर्कचा अखंड लाभ घेता येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु