
पुणे, 20 जून (हिं.स.)।
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला संरक्षण क्षेत्राशी संबंधित गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपांप्रकरणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याविरुद्ध न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. या खटल्याची सुनावणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे.
डॉ. कुरुलकर यांच्याविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियम (ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट) अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित व्यक्तीला देशाच्या संरक्षण सिद्धतेबाबत संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपावरून राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) त्यांना ४ मे २०२३ रोजी अटक केली होती.या प्रकरणात एटीएसने सुमारे दोन हजार पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. मात्र, शासकीय गुपिते अधिनियमातील काही तांत्रिक तरतुदींची पूर्तता न झाल्याने हे प्रकरण विशेष न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले होते.त्यानंतर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर खटल्याचे कामकाज विशेष सत्र न्यायालयाकडे सोपविण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात होणार असून नुकतीच आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु