परभणी - जिंतूरात 55 एकल पालक व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप
परभणी, 20 जून (हिं.स.) होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) यांच्या शैक्षणिक पालकत्व उपक्रम 2026 अंतर्गत जिंतूर तालुक्यातील 55 एकल पालक व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण करण्यात आले. शिवाजीनगर येथील लक्ष्मी फंक्शन ह
परभणी - जिंतूरात 55 एकल पालक व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप


परभणी, 20 जून (हिं.स.) होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) यांच्या शैक्षणिक पालकत्व उपक्रम 2026 अंतर्गत जिंतूर तालुक्यातील 55 एकल पालक व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण करण्यात आले. शिवाजीनगर येथील लक्ष्मी फंक्शन हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुंदरलाल सावजी जिंतूर अर्बन बँकेचे अध्यक्ष मुकुंद सावजी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्रीधर भोंबे उपस्थित होते.

यावेळी एचएआरसीचे अध्यक्ष डॉ. पवन एस. चांडक, उपाध्यक्ष डॉ. शैलेश मंत्री, डॉ. आशा चांडक, वाचन चळवळ समन्वयक प्रकाश डूबे, संतोष बारबिंडे, संतोष माहुरकर, रेणुका देशमुख, तुकाराम काळे, अशोक शिंपले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश डूबे यांनी केले, तर सूत्रसंचालन सचिन हजारे यांनी केले.

या उपक्रमाचा लाभ ताठापूर, चांदज, बेलखेडा, डोनवाडा, पुंगळा, पिंपरी, जिंतूर, संक्राळा, कोरवाडी, वझर, कुंभेफळ, मुरूमखेडा, केहाळ, निवळी, आसेगाव, वसा, येलदरी कॅम्प, केहाळ तांडा, निवळी खुर्द, बोरी आणि सांगळेवाडी येथील 55 विद्यार्थ्यांना झाला. हे सर्व विद्यार्थी एकल पालक अथवा अनाथ असून त्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

वितरित करण्यात आलेल्या शैक्षणिक किटमध्ये शाळेची बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, रंगपेटी, ड्रॉईंग बुक तसेच अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्याचा समावेश होता. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती विकसित व्हावी आणि अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थ्यास बालभारती प्रकाशित ‘किशोर’ मासिक भेट देण्यात आले. या उपक्रमासाठी समाजातील दात्यांनी उत्स्फूर्त आर्थिक सहकार्य केले. डॉ. सतीश पंचदार, सीए रोहित मंत्री, संतोष वट्टमवार, सीए सागर तोतला, पवन मुंदडा, प्रा. भूषण नाफाडे, विनायक कुंटे, सुनंदा ढाके, सतीश कुमार, वैशाली देशमुख आणि पूजा मुंदडा यांच्या योगदानामुळे हा उपक्रम यशस्वीपणे राबविता आला.

अध्यक्ष मुकुंद सावजी आणि प्रमुख अतिथी प्रा. श्रीधर भोंबे यांनी एचएआरसीतर्फे राबविण्यात येणारे शैक्षणिक पालकत्व, वाचनसंस्कृती संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचे उपक्रम प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याचे सांगितले. समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एचएआरसीचे पदाधिकारी, वाचन चळवळीचे कार्यकर्ते, स्वयंसेवक तसेच स्थानिक सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande