
परभणी, 20 जून (हि.स.) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून त्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नियोजन सभागृहात घेण्यात आले.
या वेळी निवडणूक निरीक्षक रुचेश जयवंशी यांनी स्ट्राँग रूम परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत मतमोजणीपर्यंत सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या प्रशिक्षण सत्रास निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तसेच मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजावून सांगितली. मतमोजणी केंद्रावरील जबाबदाऱ्या, मतपत्रिकांची तपासणी, वैध-अवैध मतांचे निकष, निकाल नोंदविण्याची पद्धत तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. उमेदवार प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंकांचेही त्यांनी निरसन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी सादरीकरणाद्वारे मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती दिली. मतमोजणीदरम्यान घ्यावयाची काळजी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने राबविण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था, मनुष्यबळ नियोजन आणि इतर आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून मतमोजणी शांततापूर्ण, निष्पक्ष आणि सुरळीत वातावरणात पार पडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis