
लातूर, 20 जून (हिं.स.) - खरीप हंगामासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे मृग नक्षत्र संपले असतानाही चाकूर तालुक्यासह परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृग नक्षत्राच्या प्रारंभीच पावसाचे आगमन होऊन खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र जून महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला तरी पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेत मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीसाठी शेत तयार ठेवले आहे. खत, बियाणे तसेच इतर कृषी साहित्याची खरेदी करण्यात आली आहे मात्र पावसाअभावी पेरणीची कामे अद्याप सुरू होऊ शकलेली नाहीत. तालुक्यात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस तसेच हळद या प्रमुख पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदा सोयाबीन पिकाखालील क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे मात्र पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची सर्व गणिते विस्कळीत होताना दिसत आहेत. सध्या वातावरणात उकाडा व दमटपणा कायम असून अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत आहे मात्र प्रत्यक्षात पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरत आहे.
यावर्षी खत, बियाणे तसेच कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यातच डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे मशागतीचा खर्चही वाढला आहे. पावसाअभावी पेरण्या लांबणीवर पडल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे अनेक विहिरी, बोअरवेल व लहान जलस्रोतांची पाणीपातळी घटली आहे. काही भागांत पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कृषी क्षेत्र पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने मृग नक्षत्रातील पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो मात्र यंदा मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. आता येत्या काही दिवसांत दमदार पाऊस होऊन खरीप हंगामास गती मिळेल किंवा नाही, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis