
छत्रपती संभाजीनगर, 20 जून (हिं.स.)।
गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटकांवर दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या ८ जणांपैकी ५ जण समुद्रात बुडाल्याची घटना घडली असून ३ जणांना स्थानिक बचाव पथकाने सुखरूप वाचवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील बिडकीन येथील १९ जणांचा एक गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. यातील काही युवक समुद्रात पोहण्यासाठी उतरले असता भरतीच्या पाण्याचा आणि जोरदार लाटांचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथक आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. यामध्ये तीन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र पाच युवक अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
स्थानिक शोध आणि बचाव पथकाकडून समुद्रात शोधमोहीम सुरू असून बेपत्ता युवकांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या घटनेमुळे बिडकीन परिसरासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis