
जळगाव, 20 जून (हिं.स.) : गुजरातमधील अहमदाबाद येथून चोरीला गेलेली सुमारे ₹९ लाख किमतीची ‘किया कॅरेन्स’ कार जळगाव एमआयडीसी पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून जप्त केली आहे. या कारसह चालकाला ताब्यात घेण्यात आले असून आंतरराज्य वाहनचोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 एप्रिल रोजी अहमदाबाद ग्रामीण भागातील भोपाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही आलिशान कार चोरीला गेली होती. याप्रकरणी तिथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, ही चोरीची कार नशिराबाद टोलनाका ओलांडून जळगाव शहराच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती जळगाव एमआयडीसी पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ काशीनाथ चौक परिसरात नाकाबंदी केली. संशयित वाहन दिसताच पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला, मात्र चालकाने वाहन न थांबवता वेगाने पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून अजिंठा चौफुली परिसरातील हिरो होंडा शोरूमसमोर वाहन अडवले.
चौकशीदरम्यान ही कार गुजरातमधून चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वाहनासह चालकाला एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. गुजरात पोलिसांशी संपर्क साधून माहितीची खातरजमा केल्यानंतर, सुमारे ₹९ लाख किमतीची ‘किया कॅरेन्स’ (क्रमांक एमपी 04 झेडएल 5155) आणि चालक यांचा ताबा नियमानुसार भोपाल पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. संदीप सपकाळे, पोहेकॉ. रमेश अहिरे आणि पोहेकॉ. अफजल बागवान यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर