
अमरावती, 20 जून (हिं.स.) : वरूड तालुक्यातील झटामझिरी ग्रामपंचायतीचे सरपंच हिराकांत उईके यांना पदाचा गैरवापर, कर्तव्यात कसूर आणि आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी अपर आयुक्त सूरज वाघमारे यांनी अपात्र घोषित केले आहे. ग्रामपंचायत सदस्य सुनील कंगाले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत हा आदेश देण्यात आला.
तक्रारीनुसार, सरपंच हिराकांत उईके यांनी शबरी आवास योजनेअंतर्गत आपल्या आई रामवती उईके यांच्या नावावर घरकुल मंजूर करून घेण्यासाठी पदाचा दुरुपयोग केला. तसेच, याच योजनेचा लाभ त्यांच्या भाऊ कमलनारायण उईके यांनाही मंजूर करून देण्यात आला. संबंधित नियमांनुसार एकत्रित कुटुंबातील केवळ एका सदस्यालाच या योजनेचा लाभ घेता येतो. मात्र, दोन्ही लाभार्थी एकाच कुटुंबातील असून एकाच घरात वास्तव्यास असल्याचा आरोप करण्यात आला होता.
याशिवाय, कमलनारायण उईके हे अविवाहित असूनही त्यांना घरकुल योजनेचा लाभ मंजूर करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. तसेच सरपंचांचे नातेवाईक दीपक उईके यांच्या कुटुंबालाही नियमबाह्य पद्धतीने दुसऱ्यांदा घरकुल मंजूर करून देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.
या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात आल्यानंतर सरपंचांनी पदाचा गैरवापर केल्याचे तसेच योजनेच्या अंमलबजावणीत अनियमितता झाल्याचे आढळून आले. त्यानुसार अपर आयुक्त सूरज वाघमारे यांच्या न्यायालयाने हिराकांत उईके यांना सरपंच पदासाठी अपात्र घोषित करण्याचा आदेश दिला.
या प्रकरणात अर्जदार सुनील कंगाले यांची बाजू अॅड. राजेश भोपत यांनी मांडली.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी