
बर्लिन, २० जून (हिं.स.). भारतीय नेमबाजांनी आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२६ मध्ये आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली. आणि दुसऱ्या दिवशी एकूण पाच पदके जिंकली. या कामगिरीमुळे भारताने पदक तालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखले असून, दोन दिवसांत एकूण आठ पदके (चार सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य) पटकावली आहेत.
भारतासाठी समीरने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल ज्युनियर पुरुष प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्याने अंतिम फेरीत उल्लेखनीय संयम दाखवत २८ अचूक नेमबाजीसह प्रथम क्रमांक पटकावला. ५० मीटर रायफल ३ पोझिशन ज्युनियर पुरुष प्रकारात, रोहित कन्यानने उत्कृष्ट कामगिरी करत भारतासाठी दुसरे सुवर्णपदक मिळवले आणि भारताची मोहीम आणखी मजबूत केली. महिलांच्या गटात, प्राची गायकवाडने ५० मीटर रायफल ३ पोझिशन ज्युनियर महिला प्रकारात ३५४.७ गुणांसह रौप्य पदक जिंकून भारताच्या पदकतालिकेत आणखी एका पदकाची भर घातली.
भारतीय नेमबाजांनी सांघिक स्पर्धांमध्येही दमदार कामगिरी केली. रोहित कन्यान, वेदांत नितीन वाघमारे आणि हितेश श्रीनिवासन या त्रिकुटाने ५० मीटर रायफल ३ पोझिशन ज्युनियर पुरुष सांघिक प्रकारात कांस्य पदक जिंकले.समीर, अभिनव चौधरी आणि साहिल चौधरी यांनीही २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल ज्युनियर पुरुष सांघिक प्रकारात भारताच्या पदकतालिकेत कांस्य पदकाची भर घातली. सलग दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करत, भारतीय संघाने वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारांमध्ये प्रभावी सुरुवात करून स्पर्धेत आपला दावा मजबूत केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे