
रायगड, 20 जून (हिं.स.)। : शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक आरोग्याच्या संवर्धनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करणारा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन रविवार, . २१ जून २०२६ रोजी जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली येथील प्रशस्त बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळी योग दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार असून, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय, जिल्हा युवा अधिकारी कार्यालय तसेच विविध योग संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक शांतता, एकाग्रता आणि सकारात्मक जीवनशैली विकसित होण्यास मदत होते. याच उद्देशाने दरवर्षी २१ जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाही जिल्ह्यात विविध स्तरांवर योगाभ्यास, प्रात्यक्षिके आणि जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी, विविध क्षेत्रांतील खेळाडू, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगाभ्यासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे.
योग दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)