
जळगाव, 20 जून (हिं.स.)अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या शांतता करारानंतर जागतिक बाजारात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णपेठेवरही झाला असून सोन्या-चांदीच्या दरांत मोठी घसरण झाली आहे.
गेल्या चार दिवसांपासून बाजारात मौल्यवान धातूंचे दर वेगाने आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.मागच्या २४ तासात जळगाव सराफ बाजरात सोन्याचे दर तब्बल ३,१९३ रुपयांनी तर चांदीचे दर ८,२४० रुपयांनी घसरले. या मोठ्या घसरणीमुळे सोन्याचा दर पुन्हा एकदा दीड लाखाच्या घरात आला आहे. गेल्या चार दिवसांचा विचार केला तर सोने एकूण ५,०४७ रुपयांनी तर चांदी तब्बल १६,४८० रुपयांनी स्वस्त झाली आहे.जानेवारी २०२६ च्या सुरुवातीला औद्योगिक मागणी अचानक वाढल्याने चांदीने ४,२२,३०० रुपये प्रति किलो या ऐतिहासिक व विक्रमी भावाला स्पर्श केला होता. मात्र, त्यानंतरच्या गेल्या चार महिन्यांत चांदीत सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. काल झालेल्या ८,२४० रुपयांच्या घसरणीमुळे आज शनिवारी सकाळी चांदीचा एक किलोचा दर २,४६,१७० रुपयांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे सोन्याचा भाव प्रति तोळा १,५०,१७४ रुपयांवर स्थिरावला आहे. सलग होत असलेल्या या घसरणीमुळे जळगावच्या सुवर्ण बाजारात खरेदीदारांमध्ये आता पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर