मुंबई पोलिसांत नोकरी लावण्याचे आमिष; ९ लाखांची फसवणूक, एकाला अटक
रायगड, 20 जून (हिं.स.)। मुंबई पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेची तब्बल ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रसायनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचा आणखी एक प्
Lured with promise of a job in the Mumbai Police; ₹9 lakh fraud, one arrested.


रायगड, 20 जून (हिं.स.)। मुंबई पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेची तब्बल ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रसायनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे वाशिवली, ता. खालापूर येथे १० एप्रिल २०२६ ते ३ जून २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपी क्रमांक १ ते ३ यांनी आपसात संगनमत करून पूर्वनियोजित कट रचला. त्यांनी फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करत मुंबई पोलीस विभागात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या आश्वासनावर विश्वास ठेवून फिर्यादीने आरोपींना ८ लाख ५० हजार रुपये धनादेशाद्वारे तसेच ५० हजार रुपये रोख स्वरूपात दिले. मात्र, आरोपींनी नोकरी मिळवून दिली नाही किंवा घेतलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९६/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २०५, ३१८(४), ३१६(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी क्रमांक १ याला १९ जून २०२६ रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाचकर करीत आहेत. नागरिकांनी नोकरीच्या आमिषाला बळी न पडता संबंधित भरती प्रक्रिया अधिकृत माध्यमातूनच तपासून पाहावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande