पुण्याच्या वाकड येथे फूड डिलिव्हरी बॉयकडून अंमली पदार्थ जप्त
पुणे, 20 जून : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या एका तरुणाला एमडी (मॅफेड्रॉन) पावडरची विक्री करताना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी रात्री सुमारे 8.45 वाजता वाकड परिसरात ही कारवाई करण्यात आली असून आरोपीकडून अंमली पदार्थांसह एकूण 1 लाख 58 ह
Drugs


पुणे, 20 जून : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या एका तरुणाला एमडी (मॅफेड्रॉन) पावडरची विक्री करताना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी रात्री सुमारे 8.45 वाजता वाकड परिसरात ही कारवाई करण्यात आली असून आरोपीकडून अंमली पदार्थांसह एकूण 1 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार संदीप गवारी यांनी फिर्याद दिली आहे. निसार अकबर मुजावर (वय 26, गुजर नगर, थेरगाव; मूळ रा. तुळजापूर, धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निसार मुजावर हा फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तो वाकड परिसरातील एका मोकळ्या मैदानात 7.60 ग्रॅम वजनाची, सुमारे 38 हजार रुपये किमतीची पांढरट रंगाची एमडी (मॅफेड्रॉन) पावडर विक्रीसाठी घेऊन आला होता.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एमडी पावडर, प्लास्टिक पिशव्या, एक मोबाईल फोन आणि मोपेड दुचाकी असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राथमिक तपासात आरोपी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणातील आणखी धागेदोरे शोधण्यासाठी वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande