पाऊस नाही, वीज नाही; संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी अभिजित पाटील रस्त्यावर
सोलापूर, 20 जून (हिं.स.)। पावसाअभावी आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अनियमित वीजपुरवठ्याचा मोठा फटका बसत असल्याचा आरोप करत आमदार अभिजित पाटील यांनी शनिवारी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले. द्राक्ष, डाळिंब, केळीसह विविध बागायती पिकांना वेळेवर
hgf


सोलापूर, 20 जून (हिं.स.)। पावसाअभावी आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अनियमित वीजपुरवठ्याचा मोठा फटका बसत असल्याचा आरोप करत आमदार अभिजित पाटील यांनी शनिवारी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले. द्राक्ष, डाळिंब, केळीसह विविध बागायती पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने पिके करपू लागली असून शेतकरी हवालदिल झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार पाटील म्हणाले की, एका बाजूला पावसाने दडी मारली आहे, तर दुसऱ्या बाजूला वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादकांना मोठा फटका बसला असून त्यातून शेतकरी अद्याप सावरलेला नाही.

महावितरणकडून संध्याकाळी ६ ते पहाटे ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश असल्याचे सांगितले जात असले, तरी उर्वरित वेळेत सात-सात तासांचे योग्य नियोजन करून नियमित वीजपुरवठा का केला जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उपलब्ध वेळेचे काटेकोर नियोजन करून अखंड आणि नियोजनबद्ध वीजपुरवठा करण्याची त्यांनी मागणी केली.

सरकारकडून आठ तास वीजपुरवठ्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक ग्रामीण भागांत शेतकऱ्यांना नियमित वीज मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नवीन वीजजोडण्या रखडल्या असून सौर ऊर्जा योजनांचा लाभही अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची टीका त्यांनी केली.

“वीज नसल्यामुळे शेतकरी रात्रभर जागून पाण्याची वाट पाहत आहे. डोळ्यांसमोर उभे पीक वाळताना पाहण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. याचा थेट परिणाम उत्पादन आणि उत्पन्नावर होत आहे,” असे सांगत सरकार आणि महावितरण प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार अभिजित पाटील यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande