
छत्रपती संभाजीनगर, 20 जून (हिं.स.) : पवनराजे निंबाळकर यांच्यासह झालेल्या कथित राजकीय वैमनस्यातून घडलेल्या निर्घृण हत्येच्या प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्याच्या निकालानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयावर माजी विरोधी पक्षनेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दानवे म्हणाले की, “ढीगभर पुरावे असतानाही आरोपी निर्दोष सुटणे हे अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक आहे. हा निकाल पाहून मनात संताप, चीड आणि अस्वस्थता याशिवाय काहीच उरत नाही.”
ते पुढे म्हणाले की, धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राला या प्रकरणातील आरोपी कोण आहेत हे माहीत असतानाही न्याय मिळत नाही, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. अशा निर्णयांमुळे सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात न्याय मिळणे ही केवळ एका खटल्याची बाब नसून संपूर्ण न्यायप्रक्रियेवरील विश्वासाशी संबंधित गंभीर मुद्दा असल्याचेही दानवे यांनी नमूद केले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis