
जळगाव, 20 जून (हिं.स.)जळगाव शहरातील एका मेडिकल स्टोअरविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने संबंधित औषध विक्री परवाना रद्द केला आहे. तपासादरम्यान संबंधित ठिकाणी औषधांचा कोणताही साठा आढळून आला नसून तेथे केवळ सौंदर्य प्रसाधनांची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती विभागाने दिली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, नाकोडा मेडिकल अँड जनरल स्टोअर्सविरोधात आलेल्या तक्रारींची तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत सखोल पडताळणी करण्यात आली. तपासाअंती संबंधित दुकानाचा औषध विक्री परवाना नियमानुसार रद्द करण्यात आला असून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले.याच प्रकरणात ‘सुहानी इंटरप्रायझेस’ या नावाने परवान्याविना औषध विक्री सुरू असल्याची तक्रारही प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. मात्र, तपासादरम्यान दुकानात कोणतीही औषधे आढळून आली नाहीत. तेथे फक्त कॉस्मेटिक आणि सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तूंची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे सद्यस्थितीत संबंधित आस्थापनाला औषध विक्री परवान्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणाची माहिती मुख्यालय मुंबई आणि नाशिक विभागीय कार्यालयालाही पाठविण्यात आली असून, प्राप्त तक्रारींची पडताळणी करून नियमानुसार आवश्यक प्रशासकीय कारवाई करण्यात आल्याचे अधिकृत पत्रात नमूद करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर