गंगाखेडात भंगार गोडाऊनला भीषण आग; घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान
परभणी, 20 जून (हिं.स.)। गंगाखेड रेल्वे स्थानक परिसरातील शासकीय गोडाऊनजवळ असलेल्या एका भंगार गोडाऊनला अचानक भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमधील प्लास्टिक व भंगार साहित्य जळून खाक झाले असून शेजारील घरालाही आगीची झळ बसल्याने लाखो रुपयांच
गंगाखेडात भंगार गोडाऊनला भीषण आग; घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान


परभणी, 20 जून (हिं.स.)।

गंगाखेड रेल्वे स्थानक परिसरातील शासकीय गोडाऊनजवळ असलेल्या एका भंगार गोडाऊनला अचानक भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमधील प्लास्टिक व भंगार साहित्य जळून खाक झाले असून शेजारील घरालाही आगीची झळ बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल अहमद अब्दुल खदिर कुरेशी यांच्या मालकीच्या भंगार गोडाऊनमध्ये आग लागली. गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेले लोखंडी साहित्य, प्लास्टिक साहित्य, ठिबक सिंचनाचे साहित्य, बिसलेरीच्या बाटल्या, टिनशेड आदी मोठ्या प्रमाणावरील साहित्य आगीत भस्मसात झाले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे दहा लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील राजाभाऊ गुंडप यांच्या घरालाही फटका बसला. घरातील दुचाकी, सायकल, रोख रक्कम, धान्य व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

नगरसेवक शेख साबेर, सुनील चौधरी, सय्यद सलीम, अब्दुल रहमान कुरेशी, सय्यद जहीर आदींनी धाव घेत खाजगी पाण्याचे टँकर तसेच गंगाखेड नगर परिषद व जी-7 शुगर्सचे तसेच पालम नगर पंचायतचे अग्निशमन दल पाचार करुन बंबाच्या सहाय्याने सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतु, या आगीत गोडाऊन तसेच गोडाऊन शेजारील एक घर जळून खाक झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande