लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संरक्षणाचा संदेश
लातूर, 20 जून, (हिं.स.)। वाढदिवस हा केवळ उत्सवाचा नव्हे तर समाजहिताचा संदेश देण्याचाही प्रसंग ठरू शकतो, याचा आदर्श लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या वाढदिवसानिमित्त पाहायला मिळाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धन,
जिल्हाधिकारी वाढदिवस


लातूर, 20 जून, (हिं.स.)। वाढदिवस हा केवळ उत्सवाचा नव्हे तर समाजहिताचा संदेश देण्याचाही प्रसंग ठरू शकतो, याचा आदर्श लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या वाढदिवसानिमित्त पाहायला मिळाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त लातूर आणि कापडी पिशवी वापर जनजागृती अभियान उत्साहात राबविण्यात आले. यावेळी पर्यावरण रक्षणासोबतच नागरिकांच्या आरोग्यपूर्ण आणि जबाबदार जीवनशैलीवरही भर देण्यात आला.

कार्यक्रमात वाढदिवस, लग्नसमारंभ तसेच विविध आनंदाच्या प्रसंगी फटाके, हार-तुरे आणि अनावश्यक खर्च टाळून वृक्षारोपण करण्याचा संदेश देण्यात आला. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात छोटे पण प्रभावी बदल स्वीकारण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच, प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णतः बंद करून कापडी पिशवीचा स्वीकार करण्याचे आवाहन करण्यात आले.

विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांच्या “आपले आरोग्य, आपलीच जबाबदारी” या अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या मोफत कापडी पिशवी वाटप उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. पर्यावरण संरक्षणासोबतच नागरिकांमध्ये आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.बाजारात जाताना प्रत्येक नागरिकाने स्वतःसोबत कापडी पिशवी नेण्याचा संकल्प करावा, प्लास्टिकमुक्त लातूर उभारण्यासाठी सामूहिक सहभाग वाढवावा आणि पर्यावरण संवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

“एक व्यक्ती – पाच झाडे”, “प्लास्टिकला नकार – कापडी पिशवीचा स्वीकार” आणि “पर्यावरण संरक्षण – प्रत्येकाची जबाबदारी” हा संदेश देत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले.

या प्रसंगी नायब तहसीलदार श्री. सुधीर हणमंतराव देशमुख, नायब तहसीलदार श्री. गणेश सरवदे, लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीचे अध्यक्ष श्री. नागनाथ गित्ते, उद्योजक श्री. अनिल झवर तसेच समाजसेवक संजय राजुळे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande