
अमरावती, 20 जून (हिं.स.)।
हवामान बदल, अवकाळी पाऊस, गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अचूक व स्थानिक हवामान माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महावेध प्रकल्पाला जिल्ह्यात गती मिळाली आहे. जिल्ह्यात स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या जागा निवडीचे काम जवळपास पूर्ण झाले असून९७.८७ टक्के जागांसाठी ग्रामपंचायतींचे दाखले प्राप्त झाले आहेत. त्याचवेळी महसूल मंडळ स्तरावर ९५ पैकी ९१ स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित आहेत.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ९५ महसूल मंडळे आणि ८४३ ग्रामपंचायती या प्रकल्पात समाविष्ट आहेत. महसूल मंडळ स्तरावर हवामान निरीक्षणाचे जाळे उभारण्याच्या उद्देशाने ७५३ ठिकाणी केंद्रांसाठी जागा निश्चित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यापैकी ७३७ठिकाणांसाठी आवश्यक दाखले प्राप्त झाले असून उर्वरीत ग्रामपंचायतींमध्ये शासकीय जागेची निवड करण्यात आली आहे. भातकुली, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, धारणी, दर्यापूर, तिवसा आणि वरुड तालुक्यांनी जागा निवडीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. अमरावती, अचलपूर, चांदूर रेल्वे आणि चांदूर बाजार तालुक्यांनीही उल्लेखनीय प्रगती नोंदवली आहे. महसूल मंडळ स्तरावरील प्रगती पाहता, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड, तिवसा, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी आणि धारणी या तालुक्यांतील सर्व महसूल मंडळांमध्ये केंद्रे यशस्वीरित्या कार्यरत आहेत. अमरावती तालुक्यात तीन तर चिखलदरा तालुक्यात एक केंद्र उभारणीच्या प्रक्रियेत आहे. महावेध प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेली ही केंद्रे पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा यासह विविध हवामानविषयक माहिती रिअल टाईममध्ये नोंदवितात. या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक नियोजन, सिंचन व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण तसेच नैसर्गिक आपत्तींची पूर्वतयारी करणे अधिक सुलभ होणार आहे. जिल्ह्यात प्रकल्पाची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
शेतकऱ्यांना हवामानाची अचुक माहिती मिळावी, या उद्देशाने हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. उर्वरीत जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत.
राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी