
अमरावती, 20 जून (हिं.स.)
जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने खरीप हंगामातील पेरण्या ठप्प झाल्या आहेत. यावर्षी अमरावती जिल्ह्यात सुमारे ६ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असले, तरी आतापर्यंत केवळ १,८०० हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदा सुमारे अडीच लाख हेक्टरवर सोयाबीन, अडीच लाख हेक्टरवर कपाशी, तर सुमारे १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची लागवड अपेक्षित आहे. मात्र पुरेसा पाऊस नसल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी पुढे ढकलली आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांनी शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. मान्सूनचा स्थिर आणि समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणी केल्यास बियाण्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. किमान ७० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
कृषी विभागाच्या अंदाजानुसार २४ ते २५ जूननंतर महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जिल्ह्यात चांगल्या पावसाला सुरुवात होऊन खरीप पेरण्यांना वेग येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, पावसाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून कृषी विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मान्सून सक्रिय होईपर्यंत संयम बाळगून शिफारसीनुसारच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी