
बीड, 20 जून, (हिं.स.)। नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत उद्या, २१ जून २०२६ रोजी देशपातळीवर घेतली जाणारी वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची 'नीट' परीक्षा बीड जिल्ह्यातही पार पडत आहे. जिल्ह्यातील एकूण १७ परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून, प्रशासनाने परीक्षेचे नियोजन पूर्ण केले आहे. या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेसाठी बीड जिल्ह्यातून यंदा एकूण ५ हजार ५६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, उद्या या
विद्यार्थ्यांचे भवितव्य ओआरएम शीटवर लॉक होणार आहे. परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची बायोमॅट्रिक तपासणी आणि कडक सुरक्षा तपासणी केली जाणार असल्याने, विद्यार्थ्यांनी सकाळी ११ वाजताच आपापल्या परीक्षा केंद्रावर हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, दुपारी १.३० वाजता परीक्षा केंद्रांचे
मुख्य प्रवेशद्वार बंद केले जाईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला आत प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे वेळेचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे. दुपारी २ वाजता सुरू होणारी ही परीक्षा सायंकाळी ५.१५ वाजता संपेल. यंदा परीक्षा केंद्रांवर होणारी गर्दी आणि तपासणी लक्षात घेता पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ऐनवेळची घाई टाळण्यासाठी केंद्रावर लवकर पोहोचणे फायद्याचे ठरेल असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis