
- पुरावा नष्ट करण्याचाही गुन्हा सिद्ध
लातूर, 20 जून (हिं.स.)।
शेतातील ये-जा करण्याच्या रस्त्याच्या किरकोळ वादातून एका व्यक्तीचा खून करून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, निलंगा यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे गंभीर गुन्ह्यांबाबत कठोर संदेश समाजात गेला असून, सक्षम तपास आणि ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.
पोलीस ठाणे निलंगा येथे दाखल गुन्हा क्रमांक २४९/२०२३ मधील आरोपी संभाजी गोविंद घोटाळे (रा. तळीखेड, ता. निलंगा) यास मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. पवार यांनी १७ जून २०२६ रोजी भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व २० हजार रुपये दंड, तर कलम २०१ अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने दंडाची संपूर्ण रक्कम मयताच्या वारसांना देण्याचे आदेशही दिले आहेत.
या प्रकरणातील फिर्यादी लक्ष्मण चंदर घोटाळे यांनी १४ ऑगस्ट २०२३ रोजी निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, तळीखेड शेतशिवारात शेतातील वाटेच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपी संभाजी घोटाळे याने भरत चंदर घोटाळे यांच्यावर काठीने हल्ला केला आणि गळा दाबून त्यांचा खून केला. त्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतातील आखाड्यावर जनावरांच्या गोठ्याजवळ नेऊन ठेवण्यात आला होता.
घटनेनंतर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. के. सुरवसे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळावरील पुरावे, वैद्यकीय अहवाल तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नासंबंधी महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यात आले. त्याआधारे मूळ गुन्ह्यात भारतीय दंड संहिता कलम २०१ ची वाढ करून दोषारोपपत्र मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, निलंगा येथे दाखल करण्यात आले.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपीने आरोप फेटाळले असले तरी सरकार पक्षाने सादर केलेले सुसंगत व ठोस पुरावे निर्णायक ठरले. या खटल्यात एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. विशेषतः प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षींमुळे आरोपीविरुद्धचे आरोप भक्कमपणे सिद्ध झाले.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता कपिल व्ही. पंढरीकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादासह तपास यंत्रणेने सादर केलेल्या पुराव्यांची साखळी ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.
या प्रकरणाच्या यशस्वी निकालासाठी तत्कालीन तपासी अधिकारी एस. के. सुरवसे, प्रभारी अधिकारी अभिषेक शिंदे, कोर्ट समन्वय अधिकारी सदानंद वाघमारे, कोर्ट पैरवी अधिकारी एस. के. बुलबुले तसेच एच. जी. बिरादार यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis