चौक–कर्जत महामार्गावरील वाढत्या अपघातांविरोधात राष्ट्रवादीचा इशारा
रायगड, 20 जून (हिं.स.)। कर्जत–चौक मार्गावर वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांत या मार्गावर झालेल्या भीषण अपघातांमध्ये तब्बल १४ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक ज
NCP-warns-against-rising-accid


रायगड, 20 जून (हिं.स.)। कर्जत–चौक मार्गावर वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांत या मार्गावर झालेल्या भीषण अपघातांमध्ये तब्बल १४ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.

रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. सुधाकर परशुराम घारे यांनी एमएसआरडीसी प्रशासनाला निवेदन देऊन या महामार्गावरील धोकादायक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. अनियंत्रित वेग, अपुरे दिशादर्शक फलक, रस्त्यावरील सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव आणि धोकादायक वळणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवेदनात अपघातप्रवण ठिकाणांचे तातडीने सर्वेक्षण करणे, आवश्यक ठिकाणी मानकांनुसार स्पीड ब्रेकर उभारणे, वेगमर्यादा दर्शविणारे फलक बसविणे, धोकादायक वळणांवर इशारा फलक लावणे तसेच रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढविण्यासाठी रिफ्लेक्टर आणि रस्ते चिन्हांकन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पोलिस विभागाच्या समन्वयाने वेग नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्याचीही सूचना करण्यात आली आहे.

प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा जनतेच्या सुरक्षेसाठी तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला आहे. नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande