
सोलापूर, 20 जून (हिं.स.) : पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा आयोजित करण्यात आलेल्या नीट-यूजी (NEET-UG) परीक्षेची प्रश्नपत्रिका विमानाने सोलापुरात दाखल झाली असून ती कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहे. रविवारी (21 जून) होणाऱ्या परीक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात प्रश्नपत्रिकांचे 16 परीक्षा केंद्रांवर वितरण केले जाणार आहे.
यापूर्वी झालेल्या नीट-यूजी परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून पुनर्परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा रविवारी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.15 या वेळेत होणार असून विद्यार्थ्यांना सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सोलापूर शहरातील 16 शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, या केंद्रांवर एकूण 4 हजार 507 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेच्या यशस्वी आणि सुरळीत आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आतापर्यंत चार बैठका घेऊन सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला आहे.
पेपरफुटीच्या घटनेनंतर सर्व संबंधित यंत्रणांना विशेष सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, स्ट्राँग रूममधून प्रश्नपत्रिकांचे वितरण, परीक्षा प्रक्रिया आणि उत्तरपत्रिकांचे संकलन या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
याशिवाय, परीक्षेदरम्यान सोलापूर शहर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात राहणार असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेची रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे.
नीट-यूजी पुनर्परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड