
पुणे, 20 जून (हिं.स.)। कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याचा जामीन रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांकडून २३ जून रोजी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ही माहिती दिली.सर्वोच्च न्यायालयाने कठोर अटी व शर्तींसह विशाल अगरवाल याला जामीन मंजूर केला होता. मात्र, जामिनानंतर अगरवाल आणि त्याच्या कुटुंबीयांनी जल्लोष केल्याची कथित चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी संबंधित दोघांचे जबाब नोंदवले असून डिजिटल पुरावेही संकलित केले आहेत.हे सर्व पुरावे न्यायालयात सादर करताना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.कल्याणीनगर येथे भरधाव पोर्शे कारने दुचाकीवरील तरुण आणि तरुणीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना ताब्यात घेण्यात आले होते.तपासादरम्यान आरोपींचे रक्तनमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांशी संगनमत केल्याचे उघड झाल्यानंतर विशाल अगरवाल याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, जो न्यायालयाने काही कठोर अटींसह मंजूर केला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु