
बीड, 20 जून (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि.२१ जून रोजी जिल्हाभर विविध ठिकाणी सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम सकाळी ६.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल, बीड येथे होणार आहे.
योग दिनाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, उपशिक्षणाधिकारी देवकते, क्रीडा अधिकारी अनिकेत काळे, कालिदास होसूरकर, सतीश राठोड आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरही मोठ्या प्रमाणावर योग दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात प्रशासनासोबत पतंजली योगपीठ, योगा असोसिएशन, विविध योग संघटना तसेच सामाजिक संस्था सक्रिय सहभाग घेणार आहेत.
या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, योग साधक, विद्यार्थी, युवक-युवती तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. समाजातील सर्व स्तरांतील महिला, पुरुष, युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी योग दिनात सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis