
पुणे, 20 जून (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय (भारत सरकार) पुरस्कृत पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह-सुविधा केंद्र (RCFC-WR), वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे विद्यापीठ हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावर्षीच्या ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ (Yoga for Healthy Ageing) या जागतिक संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन प्रमुख संशोधक प्रा. (डॉ.) दिगंबर मोकाट यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे औषधी रोपे देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ विष्णू शामराव मोरे आणि शोभा सुरेश हुद्दार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच प्राचार्य संताजी बाबा चव्हाण, प्राचार्य जयश्री गेंगजे आणि पर्यावरणवादी संदीप काळे यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देताना निरोगी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य, एकाग्रता आणि पर्यावरण संवर्धन याविषयी मार्गदर्शन केले.
‘योगी ओमश्री आचार्य शिव योग, पुणे’चे मुख्य योग मार्गदर्शक शिव आचार्य यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना विविध योगासने, प्राणायाम व ध्यानसाधनेचे प्रात्यक्षिक करून योगाचे आरोग्यदायी फायदे समजावून सांगितले.
प्रमुख संशोधक प्रा. (डॉ.) दिगंबर मोकाट यांनी ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग आणि औषधी वनस्पतींचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करत योग व वनस्पतीशास्त्र यांचा आरोग्य संवर्धनासाठी असलेला परस्परसंबंध स्पष्ट केला.
या उपक्रमात शाळेतील ३१० विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामूहिक योगाभ्यास केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. टी. डी. खरात, लक्ष्मण उणेचा, किशोर तराळ, विशाल जंजाळ आणि ऋतुजा वानखेडे यांनी विशेष योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. (डॉ.) दिगंबर मोकाट यांनी केले, तर छाया पोकळे यांनी आभार मानले. मनोहर निकम व योगेश्वर चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले. शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या परिश्रमांमुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. योग, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु