
सोलापूर, 20 जून (हिं.स.) : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या गणवेशांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शासनाने तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील विविध शाळांमधील गणवेशांची तपासणी प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुखांकडून करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून प्रति विद्यार्थी 280 रुपये प्रमाणे निधी देण्यात आला होता. मात्र, काही ठिकाणी कमी दर्जाचे आणि अपेक्षेपेक्षा कमी किमतीचे गणवेश वितरित केल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.
या तक्रारींची दखल घेत शासनाने जिल्हा परिषद शाळांमध्ये वाटप करण्यात आलेल्या गणवेशांची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुखांकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
तपासणी पूर्ण झाल्यानंतर गणवेशांचा दर्जा, गुणवत्ता तसेच निधीच्या वापराची सविस्तर माहिती असलेला अहवाल शासनाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड