
बीड, 20 जून (हिं.स.)।
दुधाचा भाव ठरविण्याचा अधिकार आजपर्यंत सरकार, दूध संघ किंवा खासगी डेअऱ्यांकडेच असल्याचे चित्र होते. मात्र, बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ही परंपरा मोडीत काढत स्वतःच्या दुधाचा भाव स्वतःच ठरविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दूध व्यवसायाच्या इतिहासात वडवणीने एक नवा अध्याय लिहिला आहे.
रेणुका माता मंगल कार्यालय, वडवणी येथे झालेल्या भव्य बैठकीत तालुक्यातील २० हून अधिक गावांतील ३०० पेक्षा जास्त दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. बैठकीत एकमताने ठराव मंजूर करत दुधाचा किमान दर ८० रुपये प्रतिलिटर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आता सरकारकडे भाव मागायचा नाही, तर आपल्याच मालाचा योग्य दर आपणच ठरवायचा. या निर्णयामुळे वडवणी तालुक्यात नव्या
महाराष्ट्रात प्रथमच शेतकऱ्यांनी स्वतःच दुधाचा दर निश्चित केला
दूध चळवळीची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. भेसळविरोधी कारवाईने वाढवला आत्मविश्वास राज्याचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दूध व दूधजन्य पदार्थांमधील भेसळविरोधात कठोर कारवाई केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. भेसळयुक्त दूध, बनावट खवा आणि पनीर उत्पादकांवर झालेल्या कारवाईमुळे बाजारात शुद्ध दुधाला योग्य किंमत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांनी बैठकीत सांगितले की, भेसळीमुळे खऱ्या दुधाला योग्य दर मिळत नव्हता. आता शुद्ध दूध उत्पादकांना न्याय मिळण्याची वेळ आली आहे. पशुखाद्य, चारा, औषधे, मजुरी आणि इतर खर्चात मोठी वाढ झाल्याने दूध उत्पादनाचा खर्च प्रचंड वाढला आहे. ३० ते ३५ रुपये प्रतिलिटर दराने दूध विकून खर्च भागवणे अशक्य
होत असल्याने अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायापासून दूर जात होते. याच पार्श्वभूमीवर, शेतकरी जगवायचा असेल तर दुधाला किमान ८० रुपये भाव मिळालाच पाहिजे, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. बैठकीत ठरल्याप्रमाणे तालुक्यातील कोणत्याही डेअरीला किंवा दूध संकलन केंद्राला ८० रुपयांपेक्षा कमी दराने दूध खरेदी करता येणार नाही. तसेच सर्व दूध संकलन केंद्रांवर दुधाला ८० रुपये प्रतिलिटर भाव असे फलक लावण्याचेही ठरविण्यात आले आहे. शहर व ग्रामीण भागात घरपोच दूध विक्रीही ८० रुपये प्रतिलिटर दराने सुरू झाली असून ग्राहकांकडूनही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. वडवणी तालुक्यातील हा निर्णय केवळ दरवाढीपुरता मर्यादित नसून, तो शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा आणि आर्थिक स्वावलंबनाचा नवा अध्याय मानला जात आहे. स्वतःच्या उत्पादनाचा भाव स्वतः ठरविण्याचा हा प्रयोग यशस्वी ठरल्यास, तो संपूर्ण महाराष्ट्रातील दूध उत्पादकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis