
बीड, 20 जून, (हिं.स.)। तालुक्यातील दहा मध्यम व लघु प्रकल्पांपैकी सहा प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. उर्वरित काही प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. सिंदफणा प्रकल्पात सुमारे १४ टक्के, फुलसांगवी प्रकल्पात ३ टक्के, तर मोरजळवाडी व वारणी प्रकल्पात प्रत्येकी ७ टक्के पाणी उपलब्ध आहे. उथळा, नारायणगड, हिवरसिंगा, निमगाव, खराबवाडी आणि खोकरमोह प्रकल्पांमध्ये जलसाठा संपुष्टात आला आहे. उपलब्ध एकूण पाणीसाठा केवळ २८ टक्क्यांवर आल्याने भविष्यात तालुक्याबाहेरून पाणी उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहण्याची शक्यता आहे. मातोरी, तिंतरवणी, ब्रम्हनाथ (येळंब), भानकवाडी आणि हाटकरवाडी या पाच ग्रामपंचायतींनी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे.
शिरूर कासार तालुका हा अवर्षणप्रवण भाग म्हणून ओळखला जातो. पर्जन्यमानात सातत्य नसल्याने काही वर्षी दुष्काळ तर काही वर्षी अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण होते. गतवर्षी सुरुवातीला कमी पाऊस झाला असला तरी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंदफणा व किन्हा नद्यांना पूर आला होता. मात्र, उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पाण्याच्या उपशामुळे अनेक धरणांनी आता तळ गाठला आहे.
पुढील आठवडाभरात पाऊस न झाल्यास अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची वेळ येऊ शकते. मात्र धरणे व तलावच कोरडे पडत असल्याने टँकर भरण्यासाठी पाणी कुठून उपलब्ध होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. काही ठिकाणी धरणांतील मृत साठ्यातूनही विद्युत पंपांच्या साहाय्याने पाणी उपसा होत असल्याच्या तक्रारी आहेत.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis