
परभणी, 20 जून, (हिं.स.)। नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची तसेच इतर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने काही निवडक प्रवासी गाड्यांना अतिरिक्त सर्वसाधारण (जनरल) डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवार 21 जून रोजी होणार्या नीट परीक्षेसाठी विविध भागांतून मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा केंद्रांकडे प्रवास करणार असल्याने ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सोयीस्कर व आरामदायी प्रवास करता येणार असून वाढीव प्रवासी गर्दीचे व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 57651 हजूर साहिब नांदेड-मनमाड या गाडीला 20 जून रोजी, गाडी क्रमांक 57652 मनमाड-हजूर साहिब नांदेड या गाडीला 21 जून रोजी, गाडी क्रमांक 57653 पूर्णा-आदिलाबाद या गाडीला 20 व 21 जून रोजी, गाडी क्रमांक 57654 आदिलाबाद-परळी वैजनाथ या गाडीला 21 व 22 जून रोजी, गाडी क्रमांक 57655 परळी वैजनाथ-अकोला या गाडीला 21 व 22 जून रोजी तसेच गाडी क्रमांक 57656 अकोला-पूर्णा या गाडीला 22 व 23 जून रोजी एक अतिरिक्त सर्वसाधारण डबा जोडण्यात येणार आहे.
नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून नीट परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य प्रवाशांना अधिक चांगली सुविधा मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या अतिरिक्त सुविधेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis