
रत्नागिरी, 20 जून (हिं.स.) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 'मागेल त्याला काजू कलमे' ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहे. त्याकरिता ४ लाख कलमांच्या वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
चार लाख उच्च दर्जाच्या काजू कलमांचे शासकीय रोपवाटिकेतून पूर्णपणे मोफत वाटप केले जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील २००० हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली येण्याची शक्यता असून, भविष्यात उत्पादित शेतमाल आणि प्रक्रिया केलेल्या काजूच्या माध्यमातून सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल होण्यास मदत होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
या योजनेद्वारे एका लाभार्थ्याला जास्तीत जास्त ५० काजू कलमे मोफत दिली जातील. योजनेचा किमान लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे ५ गुंठे क्षेत्र आणि कमीत कमी १० कलमांसाठी त्यांचे नाव असणे आवश्यक आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ उतारा, ८-अ उतारा, फार्मर आयडी, आधार कार्ड, ऑनलाइन भरलेला अर्ज आवश्यक आहे.इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या www.mahadbt.maharashtra.gov.in या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर केली जाईल. अर्ज करताना शेतकऱ्यांनी 'फार्मर आयडी' द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे आणि तातडीने महाडीबीटी पोर्टलवर आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी