अर्ध्या किंमतीत मोबाईल आणि सोन्याचे आमिष; कोट्यवधींची फसवणूक करणारा जेरबंद
नाशिक, 20 जून, (हिं.स.)। येवला तालुक्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये अर्ध्या किमतीत मोबाईल आणि सोने देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील नगरसूल येथील सुप्रसाद प्रमोद दीक्षित
अर्ध्या किंमतीत मोबाईल आणि सोन्याचे आमिष; कोट्यवधींची फसवणूक करणारा जेरबंद


नाशिक, 20 जून, (हिं.स.)। येवला तालुक्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये अर्ध्या किमतीत मोबाईल आणि सोने देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.

तालुक्यातील नगरसूल येथील सुप्रसाद प्रमोद दीक्षित याने परिसरातील नागरिकांसह अनेक तरुणांना कमी किमतीत मोबाईल आणि सोने उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता.

दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकांची नियुक्ती केली होती. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी पुणे येथे लपून बसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी १८ जून रोजी सिनेस्टाईल सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या सुप्रसाद दीक्षित याला काल येवला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून २४ जूनपर्यंत त्याची चौकशी करण्यात येणार आहे. प्राथमिक तपासात आरोपीने नाशिक, संभाजीनगर, पुणे यासह विविध ठिकाणी याच प्रकारे अनेक तरुणांची आणि नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, फसवणुकीची नेमकी रक्कम किती आहे आणि किती नागरिक या जाळ्यात अडकले आहेत, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून फसवणुकीचे आणखी धक्कादायक तपशील तपासातून समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आरोपीने नगरसूल परिसरामध्ये नामांकित कंपनीचे महागडे फोन अर्ध्या किमतीत विकले असून या फोन मालकांचा शोध देखील आता पोलीस घेणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande