
रायगड, 20 जून (हिं.स.) : महाड शहर पोलीस ठाणे हद्दीतील काकरतळे परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे २ लाख ६९ हजार ६२८ रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महाड (शहर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या काकरतळे येथील राहत्या घरात ही चोरी झाली. घरातील बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाटात तसेच बेडमधील सोन्याच्या दागिन्यांच्या पेटीत मौल्यवान दागिने ठेवण्यात आले होते.
चोरी गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत २ लाख ६९ हजार ६२८ रुपये असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी महाड (शहर) पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८१/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजे करीत आहेत.
दरम्यान, परिसरात घडलेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना घर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)