वेदपाठशाळा व वैदिक कार्यासाठी राज्य शासनाच्या अनुदानाची गरज – सुधीरदास महंत
पुणे, 20 जून (हिं.स.)। महाराष्ट्रातील सुमारे सव्वाशे वेदपाठशाळांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने शासनाकडून अनुदानाची गरज आहे, त्याचबरोबर वैदिक कार्यातील विद्वानांकरिता महाराष्ट्र शासनाने पुरस्कार सुरु करावेत, अशी मागणी नाशिकच्या काळाराम मंदिराचे प
वेदपाठशाळा व वैदिक कार्यासाठी राज्य शासनाच्या अनुदानाची गरज – सुधीरदास महंत


पुणे, 20 जून (हिं.स.)।

महाराष्ट्रातील सुमारे सव्वाशे वेदपाठशाळांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने शासनाकडून अनुदानाची गरज आहे, त्याचबरोबर वैदिक कार्यातील विद्वानांकरिता महाराष्ट्र शासनाने पुरस्कार सुरु करावेत, अशी मागणी नाशिकच्या काळाराम मंदिराचे प्रमुख विश्वस्त सुधीरदास महंत महाराज यांनी आज येथे केली. आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश सारख्या अनेक राज्यांमध्ये वैदिक कार्यासाठी या प्रकारचे अनुदान आणि पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्रात आज सुमारे १५ हजारांहून अधिक विद्यार्थी वेदपाठशाळांमध्ये वैदिक अध्ययन करत आहेत, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ब्राह्मण भूषण पुरस्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक संजय ओर्पे व पुरस्कारार्थी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी नसरापूर प्रकरणातील स्व. वेदवती शुभम कुलकर्णी या चिमुरडीला श्रध्दांजली वाहण्यात आली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दृकश्राव्य माध्यमातून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या. दण्डक्रम पारायणाचा विक्रम रचणारे वेदमूर्ती देवव्रत रेखे यांना ब्राह्मण भूषण पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले, त्यांच्यासोबत वेदमूर्ती महेश रेखे उपस्थित होते. विठ्ठल रखुमाई मूर्ती, पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र आणि रोख रुपये २५ हजार असे पुरस्काराचे स्वरुप होते. याशिवाय ह. भ. प. अमृता करंबेळकर यांना डॉ रामचंद्र देखणे स्मृती युवा कीर्तनकार पुरस्कार, थिंक बँकचे संपादक व युवा उद्योजक विनायक पाचलग यांना इंदुमती-वसंत करिअर भूषण पुरस्कार आणि ९६ वर्षांची परंपरा असलेल्या कऱ्हाडे ब्राह्मण संघाला भगवान परशुराम ब्राह्मण संस्था पुरस्काराने गौरविण्यात आले. कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष अमित शहाणे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्विकारला. या तिनही पुरस्कारांचे स्वरुप सन्मानचिन्ह, शाल व रोख रु. दहा हजार असे होते. यावेळी मंजिरी धुपकर लिखित गुरु-शिष्य संवाद (दासबोध) या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ब्राह्मणांसाठी असलेल्या सुयश वधू-वर सूचक मंडळाच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande