डॉ. वळसंगकर रुग्णालयावरील घराच्या वास्तव्यावरून जावई आणि सुनेत वाद
सोलापूर, २० जून : रामवाडी गोदाम परिसरातील डॉ. वलसंगकर रुग्णालयाच्या वर असलेल्या निवासस्थानी राहण्याच्या हक्कावरून वलसंगकर कुटुंबातील सदस्यांमध्ये सुरू असलेला वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात दिवंगत न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वलसंगक
डॉ. वळसंगकर रुग्णालयावरील घराच्या वास्तव्यावरून जावई आणि सुनेत वाद


सोलापूर, २० जून : रामवाडी गोदाम परिसरातील डॉ. वलसंगकर रुग्णालयाच्या वर असलेल्या निवासस्थानी राहण्याच्या हक्कावरून वलसंगकर कुटुंबातील सदस्यांमध्ये सुरू असलेला वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात दिवंगत न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वलसंगकर यांचे जावई सुजय फडके आणि सून डॉ. शोनाली वलसंगकर यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शोनाली वलसंगकर सध्या रामवाडी गोदाम परिसरातील डॉ. वलसंगकर रुग्णालयाच्या वर असलेल्या निवासस्थानी राहत आहेत. मात्र, कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या तेथे राहण्यास विरोध करत आहेत. गुरुवारी याच मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. त्यानंतर सुजय फडके यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात डॉ. शोनाली यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून डॉ. शोनाली यांनीही फडके यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, ख्यातनाम न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वलसंगकर यांचे १८ एप्रिल २०२५ रोजी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतरही वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि सेवा सोलापूरकर आजही स्मरणात ठेवतात.

सूत्रांच्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीही डॉ. शोनाली या संबंधित निवासस्थानी राहण्यासाठी आल्या असता कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यास विरोध केला होता. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंना समजावण्याचा प्रयत्न केला होता; मात्र वाद मिटू शकला नव्हता.

या प्रकरणात सुजय फडके यांचे म्हणणे आहे की, रुग्णालय परिसरातील निवासस्थान ही खाजगी मालमत्ता असून तेथे डॉ. शोनाली यांना राहण्याचा अधिकार नाही. तर दुसरीकडे, डॉ. शोनाली यांचा दावा आहे की त्या कुटुंबातील सून असून त्यांना तेथे राहण्याचा कायदेशीर अधिकार आहे.

सध्या दोन्ही पक्षांच्या तक्रारींच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या कौटुंबिक वादाची सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande