
सोलापूर, 20 जून (हिं.स.) - सोलापूर शहरासाठी प्रस्तावित १ हजार ३७८ कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान शहरातील सर्व भागांना समान आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.महापालिकेतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठका पार पडल्या. झोन क्रमांक एक आणि दोनच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी उपस्थित नगरसेवकांनी विविध सूचना मांडत तांत्रिक मुद्द्यांवर अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.बैठकीत महापौर कोंड्याल यांनी शहरातील कोणताही भाग पाणीपुरवठ्यापासून वंचित राहू नये, सर्व भागांना समान आणि शाश्वत पद्धतीने पाणी मिळावे, तसेच पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.याशिवाय, पाणीपुरवठा प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.या बैठकीला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, विभागीय कार्यालयांचे अधिकारी तसेच नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड