
जळगाव, 20 जून (हिं.स.) : गोमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी करणाऱ्या गोसेवकांवर १० ते १५ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना जळगावातील शिवाजीनगर परिसरातील उस्मानिया पार्क येथे घडली. या घटनेत दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, जखमी गोसेवक योगेश गोपाळ साळी हे आपल्या मित्रांसह कानळदा रोड परिसरात असताना त्यांना एक मालवाहू वाहन (MH-04 HD-7529) संशयास्पद अवस्थेत आढळले. वाहनातून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी चालकाला थांबवून विचारणा करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी वाहनचालक समशेर खान याने वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने कॉलनीतील १० ते १५ जणांना फोन करून घटनास्थळी बोलावले. काही वेळातच दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
हल्ल्यादरम्यान समशेर खानच्या भावाने राहुल सोनवणे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जबर मारहाण केली, ज्यामुळे ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या योगेश साळी यांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली.
या घटनेत राहुल सोनवणे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून योगेश साळी यांच्यावरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी योगेश साळी यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
-------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर