
सोलापूर, 20 जून (हिं.स.)।
जून महिन्याचा पंधरवडा उलटून गेला तरी सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसू लागली असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गतवर्षी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसमोर यंदा अपुऱ्या पावसाचे नवे संकट उभे ठाकल्याने खरीप हंगामाबाबत अनिश्चितता वाढली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४६.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस जून महिन्याच्या सरासरीच्या केवळ ४५.१ टक्के आहे. जूनमध्ये सरासरी १०२.५ मिलिमीटर पर्जन्यमान अपेक्षित असताना यंदा ५६.३ मिलिमीटरची तूट नोंदविण्यात आली आहे. परिणामी, जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खरीप पेरण्यांना अद्याप सुरुवात झालेली नाही.खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मशागत, नांगरणी आणि वखरणीची कामे पूर्ण करून बियाणे आणि खतांच्या खरेदीची तयारी केली आहे. मात्र, पुरेशा पावसाअभावी पेरणीचे नियोजन पुढे ढकलावे लागत आहे.यंदा अवकाळी पावसानेही अपेक्षित साथ दिली नाही. त्यातच मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे अनेक बागायती पिकांनी तीव्र उन्हाळ्यातही तग धरला होता. मात्र, आता भूजलपातळी खालावत असून अनेक बोअरवेल्समधील पाण्याची उपलब्धता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे उपलब्ध जलस्रोतांचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड