फिफा विश्वचषक २०२६ : ऑस्ट्रेलियाला २-० ने पराभूत करत अमेरिका नॉकआऊट फेरीत
सिएटल(अमेरिका), 20 जून (हिं.स.) फिफा विश्वचषक २०२६च्या गट ''डी'' सामन्यात अमेरिकेने ऑस्ट्रेलियाला २-० ने पराभूत करत आपला सलग दुसरा विजय मिळवला आणि ३२ संघांच्या फेरीत आपले स्थान निश्चित केले. सिएटल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या ३२ व्या स
अमेरिकेचा फुटबॉल संघ


सिएटल(अमेरिका), 20 जून (हिं.स.) फिफा विश्वचषक २०२६च्या गट 'डी' सामन्यात अमेरिकेने ऑस्ट्रेलियाला २-० ने पराभूत करत आपला सलग दुसरा विजय मिळवला आणि ३२ संघांच्या फेरीत आपले स्थान निश्चित केले. सिएटल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या ३२ व्या सामन्यात, अमेरिकन संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला आणि पहिल्या हाफमध्ये दोन गोल करून सामन्यावर आपली पकड घट्ट केली.

अमेरिकेने सामन्याच्या ११ व्या मिनिटाला पहिला गोल केला. फोलारिन बालोगुनच्या खालच्या क्रॉसला क्लिअर करण्याचा प्रयत्न करताना ऑस्ट्रेलियन बचावपटू कॅमेरॉन बर्जेसने आत्मघाती गोल केला. या गोलमुळे अमेरिकेला १-० अशी आघाडी मिळाली आणि ऑस्ट्रेलियन संघावरील दबाव वाढला.

पहिल्या हाफच्या शेवटच्या क्षणांमध्ये अमेरिकेने आपली आघाडी दुप्पट केली. ४३ व्या मिनिटाला, सर्जिनो डेस्टच्या प्रयत्नानंतर ॲलेक्स फ्रीमनने बॉक्सच्या आतून एक शानदार हेडर मारून गोल केला. या गोलचे व्हिडिओद्वारे पुनरावलोकन करण्यात आले, परंतु पंचांनी तो गोल वैध ठरवला. यामुळे, अमेरिकेने मध्यंतरापर्यंत २-० अशी भक्कम आघाडी घेतली.

दोन गोलने मागे पडल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या हाफमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि काही चांगले हल्ले चढवले, परंतु अमेरिकेच्या बचावापुढे त्यांना यश आले नाही. अमेरिकेने सामन्याच्या शेवटच्या क्षणांपर्यंत आघाडी कायम ठेवली आणि ऑस्ट्रेलियाला कोणतीही संधी दिली नाही.

या विजयासह, अमेरिकेने 'गट डी' मध्ये आपला सलग दुसरा विजय मिळवला आणि ३२ संघांच्या फेरीत (राऊंड ऑफ ३२) स्थान मिळवले. विश्वचषकाच्या इतिहासात दुसऱ्यांदाच असे घडले आहे की, अमेरिकेच्या संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात सलग दोन विजयांनी केली आहे. पण, हा पराभव ऑस्ट्रेलियासाठी पुढील मार्ग खडतर ठरू शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande