
सोलापूर, 20 जून (हिं.स.) : शहरातील अनियमित, अपुरा आणि दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर राष्ट्रीय छावा संघटना आक्रमक झाली असून प्रदेश उपाध्यक्ष ॲड. योगेश पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच पुढील 15 दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
ऍड. पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही सोलापूर शहरात पाच ते सहा दिवसांतून केवळ एकदाच पाणीपुरवठा होत आहे. सार्वजनिक आरोग्याच्या निकषांनुसार प्रत्येक नागरिकाला नियमित आणि स्वच्छ पाणी मिळणे अपेक्षित असताना शहरातील अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
तसेच, कमी क्लोरीनेशन, गळक्या पाइपलाइन आणि मलमिश्रित पाणीपुरवठ्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ आणि टायफॉईडसारख्या आजारांचा धोका वाढल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. काही भागांत काळे आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पाणीपुरवठा सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपयांची विकासकामे आणि निविदा राबविण्यात येऊनही अपेक्षित सुधारणा दिसत नसल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. संपूर्ण पाणीपुरवठा योजनेची स्वतंत्र तृतीय पक्षामार्फत गुणवत्ता तपासणी करून त्याचा अहवाल तसेच खर्चाचे लेखापरीक्षण (ऑडिट) सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून या कालावधीत नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा सुरू न झाल्यास सोलापूर महानगरपालिकेविरोधात उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयात जनहित याचिका दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही योगेश पवार यांनी दिला आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड