
अमरावती, 21 जून (हिं.स.)। शहरालगतच्या बडनेरा परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर एका २३ वर्षीय तरुणाची अत्यंत क्रूरपणे आणि योजनाबद्ध रीतीने हत्या करण्यात आली. ओम कैथवास (वय २३ वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुनी वस्ती परिसरात घडली. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ओम कैथवास हा आपल्या दुचाकीने भगतसिंग चौकातील देशी दारू दुकानाच्या मार्गाने जात होता. याच दरम्यान, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी ओमला गाठले आणि अचानक त्याच्या डोळ्यात मिरचीची पावडर फेकली.
मिरची पावडर डोळ्यात गेल्यामुळे ओमला काहीच दिसेनासे झाले आणि त्याचा दुचाकीवरील तोल जाऊन तो रस्त्यावर जोरदार कोसळला. तो जमिनीवर पडताच हल्लेखोरांनी कोणतीही संधी न देता त्याच्यावर धारदार चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर जखमी झालेला ओम रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि तपास चक्रे फिरवली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील तीन संशयितना ताब्यात घेतले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतांपैकी एक जण अल्पवयीन आहे. तर उर्वरित दोन आरोपींची नावे संकेत आणि माता फैल परिसरातील रोशन अशी समोर आली आहे. बडनेरा पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा हल्ला कोणत्याही तात्कालिक कारणावरून झालेला नसून, यामागे जुने वैमनस्य कारणीभूत असल्याची चर्चा परिसरात आहे. हल्लेखोरांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ओमच्या हत्येचा कट रचला होता. पोलिसांनी या प्रकरणी रविवारी पहाटे अज्ञातन विरुद्ध कुणाचा गुन्हा दाखल केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी